सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

महाराष्ट्र

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, प्रांत अधिकारी आशिष बारकोल, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

बैठकीदरम्यान बसस्थानकाचा सध्याचा आराखडा सादर करण्यात आला. मात्र, नव्या ‘आऊट गेट’चा त्यामध्ये कुठेही उल्लेख नसल्याचे लक्षात येताच मंत्री भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक जटिल बनत असून तो तातडीने सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील बाजूने बसेस बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग काढून सुधारित आणि अद्ययावत आराखडा तयार करावा, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

विभाग नियंत्रक श्रीमती गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांनी काही कारणे देत चालढकल करण्याचा प्रयत्न केल्याने मंत्री भोसले आणि जिल्हाधिकारी पाटील यांनी त्यांना खडसावले. “प्रस्ताव कसा मंजूर करून घ्यायचा हे मी पाहतो; मात्र आराखडा व्यवस्थित आणि सर्व सुविधांसह तयार झाला पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा

बैठकीत आपटी-तपोळा पुलासाठी रस्ता अधिग्रहण, वर्णे आबापुरी तीर्थक्षेत्र विकासकामे, आंबेघर तर्फ कुडाळ येथील जमीन विषय, म्हसवे (ता. सातारा) येथील कातकरी गृहसंकुलासाठी २० टक्के वाढीव अनुदान व लाभार्थी सर्वेक्षण, कुशी (ता. सातारा) येथील डवरी समाजासाठी घरकुल योजना, नागेवाडी येथील आयटी पार्क प्रस्ताव, परळी (ता. सातारा) येथील सहा गावांचे एलजीडी कोड, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी आणि तांडावस्ती प्रस्ताव मंत्रालयात सादर करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

आपटी-तपोळा पुलासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण करून संबंधित शेतकऱ्यांना निकषानुसार मोबदला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच नागेवाडी येथील आयटी पार्कसाठी जमीन नकाशा तयार असून दोन दिवसांत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा देण्याचा भर

सध्याच्या बसस्थानक रचनेत बदल न करता आराखडा तयार करण्याबाबत मंत्री भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, वाहतूक सुरळीत व्हावी आणि शहरातील कोंडी कमी व्हावी, यासाठी आधुनिक आणि व्यवहार्य असा सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले.वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला