शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर अश्लील शिवीगाळ केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास निघाल्याच्या कारणावरुन पती, सासू आणि सासऱ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात आत्माराम पंढरीनाथ बीडगर, सिधा संभाजी शेंडगे, संभाजी म्हस्कु शेंडगे आणि शालन संभाजी शेंडगे, (सर्व रा. न्हावरे, ता. शिरुर, जि.पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:५१ वाजता फिर्यादी महिला आणि त्यांचे पती घरी होते. त्यावेळी पतीच्या मोबाईलवर आत्माराम बीडगर याचा फोन आला. फिर्यादीने फोन घेतल्यानंतर आरोपीने त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या पतीबाबत आणि मुलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
हा घडलेलासर्व प्रकार फिर्यादीने पती आणि सासऱ्यांना सांगितला. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी हा प्रकार दुर्लक्षित करण्यास सांगितले. फिर्यादी महिला आत्माराम बीडगर याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाल्या असता पती, सासू आणि सासऱ्याने त्यांना तक्रार देण्यासाठी जाऊ दिले नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जुलै रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजता फिर्यादी पुन्हा तक्रार देण्यासाठी घराबाहेर पडत असताना पती, सासू आणि सासऱ्याने त्यांना अडविले. आत्माराम बिडगर माफी मागेल, त्यामुळे पोलिसांत जाऊ नकोस, असे त्यांनी सांगितले. मात्र, संबंधित व्यक्तीने पोलिस ठाण्यात येऊन माफी मागावी, अशी भुमिका फिर्यादीने घेतली.
यावरुन वाद वाढला अन फिर्यादीच्या सासऱ्याने त्यांना घरात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासूने केस धरुन घराबाहेर ओढत मारहाण केली. त्यानंतर सासऱ्याने काठीने पाठीवर मारहाण करुन जखमी केले, तर पतीने पोटात लाथ मारली.
तसेच यापुढे आत्माराम बिडगर याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेल्यास जीवे मारुन टाकू, अशी चौघांनी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीचा आवाज ऐकून वस्तीवरील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत भांडण सोडविले.
या घटनेनंतर फिर्यादीने आपल्या आईला फोन करुन माहिती दिली. त्यानंतर आई, भाऊ आणि मामा यांनी न्हावरे येथे येऊन फिर्यादीला न्हावरे पोलिस चौकीत नेले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पत्र दिल्यानंतर फिर्यादीवर न्हावरे ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार शिवाजी भोते हे करत आहेत.