शिरुर! पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरची पायवारी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात युवकाचा अनोखा एल्गार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात, पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जातात आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा दिला जातो. मात्र, दुसरीकडे एका पर्यावरणप्रेमी युवकाने स्वतःच्या कष्टातून लावलेली हजारो झाडे वाचविण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा संतापजनक प्रकार शिरुर तालुक्यात समोर आला आहे.

रांजणगाव सांडस गावातील गायरान क्षेत्रात हजारो झाडे लावणारे वृक्षमित्र पैलवान उमेश रणदिवे यांनी या झाडांच्या संरक्षणासाठी थेट पंढरपुरच्या विठ्ठलालाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने रणदिवे यांनी पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरकडे पायी प्रस्थान केले आहे. त्यांची ही अनोखी पायवारी केवळ श्रद्धेची नसून, निष्क्रिय आणि असंवेदनशील प्रशासकीय व्यवस्थेविरोधातील मूक आंदोलन असल्याचे बोलले जात आहे.

स्वतःच्या कष्टातून उभे केले हिरवे जंगल… 

पै उमेश रणदिवे यांनी रांजणगाव सांडस येथील गायरान परिसरात अनेक वर्षे परिश्रम घेऊन विविध प्रजातींची हजारो झाडे लावली. झाडे लावण्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी त्यांना पाणी देणे, निगा राखणे, जनावरांपासून संरक्षण करणे आणि उन्हाळ्यात ती जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

शासनाच्या कोणत्याही मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता, लोकसहभाग आणि स्वतःच्या श्रमातून त्यांनी ओसाड गायरानावर हिरवाई फुलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही हिरवाई आता अतिक्रमण, अवैध मुरुम उत्खनन, वारंवार लागणाऱ्या आगी आणि इतर बेकायदेशीर हालचालींमुळे धोक्यात आल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे.

अनेक झाडे जळून खाक; जबाबदार कोण…?

गायरान क्षेत्रात विविध कारणांमुळे अनेक झाडे जळून गेली आहेत. वर्षानुवर्षे वाढविलेली झाडे राख होत असताना संबंधित महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणा नेमक्या काय करत होत्या, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

गायरान जमिनीची देखभाल आणि संरक्षण करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाची असताना त्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याचा आरोप आहे. तसेच, बेकायदेशीर मुरुम उपसा आणि अन्य प्रकार सुरु असतील, तर ते अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आले नाहीत…? आणि निदर्शनास आले असतील, तर संबंधितांवर कारवाई का झाली नाही…? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी; तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही

याबाबत उमेश रणदिवे यांनी गायरानातील झाडे वाचविण्यासाठी आणि तेथे सुरु बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी शिरुरचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांची अनेकदा भेट घेतल्याचे सांगितले. परंतु दोन्ही खात्यातील अधिकाऱ्यांनी आमच्या खात्याचा त्यात काहीही संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. तसेच संबधित अधिकाऱ्यांनी गायरानाची पाहणी करावी, झाडांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, अतिक्रमणांची चौकशी करावी आणि अवैध उत्खनन होत असल्यास तातडीने कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी वारंवार केली. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे.

एखादा सामान्य नागरिक सरकारी कार्यालयात किरकोळ कामासाठी गेला तरी त्याला अर्ज, पंचनामा, नकाशा, अहवाल आणि मंजुरीच्या चक्रात फिरविले जाते. मग सरकारी मालकीच्या गायरान जमिनीवर कथित अतिक्रमण आणि अवैध उत्खनन होत असेल, तर महसूल यंत्रणा इतकी हतबल का दिसते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाने दखल घेतली नाही, म्हणून विठ्ठलाच्या दारी…

लोकशाही व्यवस्थेत नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे जाणे अपेक्षित असते. मात्र, प्रशासनानेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कुणाकडे जावे…? हा प्रश्न उमेश रणदिवे यांच्या पायवारीमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना वारंवार विनंती करुनही झाडांच्या संरक्षणाबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाठीवर वडाचे झाड घेऊन निघालेली ही पायवारी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत निषेध आहे.

‘सरकारी अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसेल, तर आता विठ्ठलानेच माझ्या झाडांचे आणि गायरानाचे रक्षण करावे,’ अशी या आंदोलनामागील भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.

वृक्षारोपणाच्या जाहिराती एकीकडे; प्रत्यक्ष झाडांकडे दुर्लक्ष दुसरीकडे…

दरवर्षी पावसाळ्यात शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत आणि विविध विभागांकडून मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले जाते. फोटो काढले जातात, सोशल मीडियावर प्रसिद्धी केली जाते आणि वृक्षसंवर्धनाच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात लावलेली झाडे किती जगली, त्यांचे संरक्षण झाले का आणि त्यांची नोंद ठेवली का…? याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.

रांजणगाव सांडस येथे एका युवकाने हजारो झाडे स्वतः जगविण्याचा प्रयत्न केला. अशा युवकाच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहणे अपेक्षित असताना त्यालाच पाठीवर झाड घेऊन अनेक किलोमीटर पायी जावे लागत असेल, तर शासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

गायरानाचा खरा राखणदार कोण…?

गायरान जमीन ही गावाची सार्वजनिक संपत्ती आहे. ती कोणाच्या वैयक्तिक मालकीची नसून गावातील पशुधन, पर्यावरण आणि सार्वजनिक गरजांसाठी राखीव असते. अशा जमिनीवर अतिक्रमण होत असेल, मुरुम काढला जात असेल किंवा झाडांची हानी केली जात असेल, तर त्यासाठी नक्की कोण जबाबदार आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच संबंधित प्रशासनाने पुढील प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे.

1) रांजणगाव सांडस येथील गायरानाची शेवटची अधिकृत पाहणी कधी झाली…?

2) गायरानात कोणतीही अतिक्रमणे आढळली आहेत का…?

3) मुरुम उत्खननासाठी कोणाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का…?

4) झाडे जळाल्याच्या घटनांची चौकशी झाली का…?

5) रणदिवे यांच्या तक्रारींवर कोणती कार्यवाही करण्यात आली?

6) संबंधित तलाठी, मंडल अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली का…?

7) दोषी आढळल्यास कोणावर आणि केव्हा कारवाई होणार…?

झाडे लावणाऱ्याला पुरस्कार नको; संरक्षण हवे

पै उमेश रणदिवे यांना सत्कार, पुष्पगुच्छ किंवा प्रमाणपत्राची अपेक्षा नाही. त्यांनी लावलेली झाडे सुरक्षित राहावीत, गावच्या गायरानाचे संरक्षण व्हावे आणि अतिक्रमण व बेकायदेशीर प्रकार थांबावेत, एवढीच त्यांची मागणी आहे.

मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एका वृक्षमित्राला पाठीवर झाड घेऊन विठ्ठलाच्या दारी जावे लागत असेल, तर हि घटना केवळ रांजणगाव सांडसपुरती मर्यादित राहत नाही. ती संपुर्ण प्रशासनाच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि पर्यावरणाबाबतच्या शासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

 

आता तरी प्रशासन जागे होणार का…?

उमेश रणदिवे यांची पायवारी सुरु झाल्यानंतर तरी शिरुर तहसील प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का…? गायरानाची तातडीने संयुक्त पाहणी केली जाणार का…? अतिक्रमण आणि कथित अवैध मुरुम उपशाची चौकशी होणार का…? जळालेल्या झाडांची जबाबदारी निश्चित होणार का…? उर्वरित हजारो झाडांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार का…? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.त्यामुळे पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरकडे निघालेला हा युवक प्रशासनाला एकच प्रश्न विचारत आहे.

“झाडे लावणे हा गुन्हा आहे का…? आणि ती वाचविण्यासाठी नागरिकाने आणखी किती उंबरठे झिजवायचे…?” आता पंढरपुरचा पांडुरंग पावतो की नाही, हा श्रद्धेचा विषय आहे. परंतु शिरुरचे प्रशासन जागे होते की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत