राजकोट: राजकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलगी आणि पुतणीवर गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींनी अखेर नातेवाईकांकडे आपली आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घरात कोणी ऐकू नये म्हणून दरवाजे बंद करून टीव्हीचा आवाज मोठा करत असे. तसेच मुलींना धमकावून आणि आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होते. या अत्याचारांचा कालावधी पाच ते सात वर्षांपर्यंत असल्याची माहिती पीडितांनी दिली आहे.
पीडित मुली अत्यंत भीतीच्या वातावरणात होत्या. बराच काळ गप्प राहिल्यानंतर त्यांनी धैर्य एकवटून नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
राजकोट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.ही घटना समोर येताच राजकोट शहरासह परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.