शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अनधिकृत पद्धतीने बालिकेला दत्तक दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बाल संरक्षण अधिकारी शत्रुघ्न रूस्तूम खोकले (वय ३१, रा. आळंदी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमनाथ अर्जुन पोटावळे व त्यांच्या पत्नी यशोदा सोमनाथ पोटावळे (रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर) तसेच दत्तक घेणारे बालाजी अणासाहेब जाधव व सुलभा बालाजी जाधव (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी शिरूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज क्र. ११२/२०२३ नुसार दत्तकपत्राची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया करताना बाल न्याय अधिनियमांतर्गत आवश्यक असलेली अधिकृत व कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्णपणे पाळण्यात आलेली नव्हती. संबंधित नवजात बालिका ‘प्रिशा’ हिला कोणतीही वैधानिक परवानगी न घेता थेट दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक देण्यात आल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल तीन वर्षांनंतर उघडकीस आला असून, १३ एप्रिल २०२६ रोजी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ मधील कलम ८० नुसार, अधिकृत प्रक्रिया न पाळता मुलांचे दत्तक देणे किंवा घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करत असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे बाल दत्तक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत