रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी महाराष्ट्रातील एक महिला ठार तर चार बेपता….

क्राईम

सिहोर: मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरश्वर धाम नावाने परिचीत असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर विठ्ठलेश सेवा समितीने आयोजीत केलेल्या रुद्राक्ष महोत्सव व शिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक महिला जागीच ठार झाली, तर चार महिला अजून बेपता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर मधील रुद्राक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक रात्रीपासूनच सिहोर मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती, तर येथे कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते साधे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते त्यामुळे असंख्य भाविक हे रात्रीपासून अन्न पाण्यावाचून उपाशी होते. रुद्राक्ष वाटप कार्यक्रम सुरु होताच भाविकांची झुंबड उडाली व त्यात हि दुर्घटना घडली.

सिहोर इथे मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक इथे पोहोचले आहेत. सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. तर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

आठ दिवसात 15 लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक पोहचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करीत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले होते.