शिरुरमध्ये ‘एमडी’चा सुळसुळाट उघड; अल्पवयीनाच्या हातून लाखोंचा मेफेड्रोन जप्त, पोलिसांची धडक कारवाई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके)शिरुर शहरात अमली पदार्थांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा धक्कादायक पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून झाला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून मेफेड्रोन (एमडी) विक्रीचा काळाबाजार सुरु असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दि ११ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे पथक शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी मोहीम राबवत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. शिरुर बायपासवरील बंद पडलेल्या ‘नाना स्पॉट’ हॉटेलजवळ एक अल्पवयीन मुलगा मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी क्षणार्धात हालचाली सुरु केल्या.

त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलिसांनी संयुक्त सापळा रचला आणि संशयित अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी त्याला वेढा घालत ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून ६.९४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) तब्बल १ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईने शिरुरमधील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरुर पोलीस करत असून या मागील मोठ्या साखळीचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.

ड्रॅग माफियांची नवी शक्कल…?

या प्रकरणामुळे ड्रग्ज माफिया आता कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अल्पवयीनांचा वापर करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शिरुरसारख्या तालुक्यात एमडीसारख्या घातक अमली पदार्थाची विक्री होत असल्याने पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर,नीरज पिसाळ यांच्या पथकाने अचूक नियोजन करत ही कारवाई यशस्वी केली.

पोलिसांचा इशारा “ड्रग्जविरोधात झिरो टॉलरन्स!”

पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. अशा कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत