नागरिकांच्या सतर्कतेने शिक्रापुरात फिरणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास बेड्या…

क्राईम मुख्य बातम्या

तोतयाकडे महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे देखील ओळखपत्र

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन फिरणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून चंद्रमणी शशिकांत शेवाळे, असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील वाजे गुळाचा चहा येथे आज १९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक पोलीस अधिकारी असून तो संशयित पणे वावरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, होमगार्ड सुहास डांगे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता हुबेहूब पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश व पेहराव धारण केलेला पोलीस अधिकारी दिसून आले.

त्यामुळे पोलिसांनी सदर पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असताना त्याच्याजवळ महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे सहाय्यक सचिव या पदाचे ओळखपत्र मिळून आले. मात्र तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने तो तोतया पोलीस अधिकारी असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस हवालदार शंकर नारायण साळुंके रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी चंद्रमणी शशिकांत शेवाळे (वय १९) रा. मेरी मसकड राजवाडा वक्रतुंड नगर नाशिक मूळ रा. जांबूटके ता. दिंडोरी जि. नाशिक याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार व पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.

वय व उंची कमी मग गणवेश आणि ओळखपत्र आले कोठून

शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे (वय १९), उंची देखील कमी मग त्याच्याकडे शासकीय गणवेश व ओळखपत्र आले कोठून असा सवाल आता उपस्थित केला जात असून सदर प्रकारामुळे पोलीस देखील चक्रा वून गेले आहेत.