टीआरपीत अव्वल असलेल्या ‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट; गाजलेला खलनायक अनंत जोग यांची एंट्री

मनोरंजन

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. दररोज येणारे नवे ट्विस्ट, नाट्यमय वळणं आणि दमदार अभिनय यामुळे मालिकांची लोकप्रियता टिकून असते. झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळतेय. अशातच झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ टीआरपी यादीत आपलं भक्कम स्थान निर्माण करताना दिसतेय. सध्या ही मालिका टीआरपी यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

‘तारिणी’ या मालिकेत सध्या घडणाऱ्या घडामोडींनी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कौशिकीने युवराज आणि त्याच्या पत्नीला तारिणी व केदारची माफी मागायला लावल्यानंतर संतप्त झालेल्या युवराजने केदारवर जीवघेणा हल्ला केला. मात्र तारिणीने प्रसंगावधान राखत केदारचे प्राण वाचवले. या घटनेनंतर तारिणी आणि केदार यांच्यातील नातं अधिक घट्ट होत असून प्रेमाची नवी सुरुवात होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, पुढील भागात कौशिकी तारिणीला केदारवर हल्ला कोणी केला, असा प्रश्न विचारते. मात्र तारिणी आणि केदार दोघेही सत्य लपवतात. इकडे केदार शुद्धीवर आल्याचं पाहून युवराजच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याची भीती आणखी वाढते. अशातच मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

झी मराठीने नुकताच एक नवा प्रोमो शेअर केला असून, त्यामध्ये मालिकेत होणाऱ्या एका नव्या अभिनेत्याच्या एंट्रीची झलक दाखवण्यात आली आहे. हा अभिनेता झी मराठीवरील मालिकांमधील गाजलेला आणि प्रभावी खलनायक असून, केवळ आवाजाच्या जरबेने समोरच्याला धाकात ठेवणारा आहे. प्रोमोमध्ये हा अभिनेता काळा कोट, डोक्यावर टोपी घालून गाडीतून उतरताना दिसतो. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी नेटकऱ्यांनी त्याला ओळखलं आहे.

हा अभिनेता म्हणजेच अनंत जोग. आपल्या घाऱ्या डोळ्यांनी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनंत जोग आता ‘तारिणी’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रोमोवरून ते राजकारणी व्यक्तीच्या भूमिकेत असल्याचं संकेत मिळत असून, त्यांच्या एंट्रीने कथानकात नवं वादळ उठण्याची शक्यता आहे.

आता अनंत जोग यांची भूमिका सकारात्मक असणार की नकारात्मक, त्यांच्या येण्याने तारिणीच्या आयुष्यात कोणते नवे संघर्ष उभे राहणार, आणि केदार-तारिणीच्या नात्यावर याचा काय परिणाम होणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे.