मुंबई: ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनने हाती घेतलेल्या ‘मिशन तन्वी’मुळे कथानकाला जबरदस्त वेग आला आहे. नागराजने तुरुंगात जाताना दिलेल्या हिंटनंतर दोघांनाही प्रियाच खरंच प्रतिमाची मुलगी आहे का, याबाबत संशय निर्माण झाला आहे. आता याच संशयाचा छडा लावण्यासाठी ते पुरावे गोळा करताना दिसत आहेत.
होळीच्या सणात उलगडला संशयाचा धागा
सुभेदारांच्या घरी होळीचा उत्सव रंगतो. अन्नपूर्णा आजी पुरणपोळीचा घास घेताच चव अगदी प्रतिमासारखी असल्याचं सांगते. “या पोळ्या प्रियाने केल्या का?” असा थेट सवाल होताच प्रिया “आमचं रक्ताचं नातं आहे” असं म्हणत विषय झाकण्याचा प्रयत्न करते. मात्र या संवादानंतर सायलीच्या मनात संशय अधिकच गडद होतो.
प्रतिमाची प्रकृती बिघडली, प्रियाचा नकार
होळीच्या आनंदातच प्रतिमाची प्रकृती अचानक खालावते आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागतं. रक्ताची गरज भासल्यावर प्रिया सगळ्यांसमोर रक्त देण्यास नकार देते. स्वतःच्या आईला रक्त न देण्यामागे नेमकं कारण काय? या प्रश्नाने सायली-अर्जुनच्या शोधकार्याला नवी दिशा मिळते.
अर्जुनचा डाव आणि प्रियाचा प्रयत्न
रंगपंचमीच्या दिवशी सुभेदारांच्या घरी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जातो. अर्जुन हुशारीने प्रियाचं ब्लड सॅम्पल मिळवतो. मात्र प्रिया रिपोर्ट्स बदलण्यासाठी फोन करताना दिसते. अर्जुन-सायली आधीच सावध असल्याने तिचा डाव उधळला जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निर्णायक ठरणार रक्तगट तपासणी
आता या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे रक्तगट तपासणीचा रिपोर्ट. प्रिया आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप जुळला नाही, तर ‘रक्ताचं नातं’ हा दावा कोसळणार का? की मालिकेत आणखी एखादा धक्कादायक ट्विस्ट येणार?या सगळ्या घडामोडींमुळे ‘मिशन तन्वी’ अधिकच रंजक बनलं आहे. प्रियाचे खरे रिपोर्ट्स अर्जुनच्या हाती लागणार की पुन्हा एकदा ती सगळ्यांना चकवणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ८:४५ ते ९:३० आणि शनिवार-रविवार ८:३० ते ९:०० या वेळेत प्रसारित केली जाते.