‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन

मनोरंजन

पुणेः शिलेदार कुटुंब आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीतनाट्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या दिग्गज व्यक्तींची ओळख पुढील पिढीला व्हावी या दृष्टीने या लघुचित्रपटाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या ‘नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन झाले असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट, संवाद पुणे आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने जयमाला शिलेदार यांच्या ९६ व्या जन्मदिनी पूजनीय अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यावर आधारित ‘नाट्यब्रह्म’ या लघुचित्रपटाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले, लघुपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शक दिप्ती भोगले, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे कनिष्ठ बंधु सुभाष सराफ, संवाद,पुणेचे सुनील महाजन, नंदकुमार काकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘नाट्यब्रह्म’ हा लघुचित्रपट दाखविण्यात आला.

यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, पब्लिसिटीच्या जगात जुन्या गोष्टींकडे वेळ द्यायला कोणाकडे वेळच नाही आहे. परंतु आपण आपला ही समृद्ध परंपरा न विसरता त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे. संगीत नाटक क्षेत्रात मी देखील सुरुवातीला लुडबुड केली आहे. परंतु हे आपले क्षेत्र नाही हे वेळीच ओळखले आणि चित्रपट क्षेत्रात गेलो. लघुपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शक दिप्ती भोगले यांनी ‘नाट्यब्रह्म’ची निर्मीती प्रक्रिया उलगडली. प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले आणि सुभाष सराफ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संवादचे सुनील महाजन यांनी प्रास्तिवक केले.