शब्द पाळणारा नेता राजेंद्र जगदाळे (RB) अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर उजळला प्रकाश…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील अनोसेवाडी येथील वाडी-वस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र दिलेला शब्द पाळत करडे गावचे सुपुत्र आर बी पाटील (राजेंद्र) जगदाळे यांनी या समस्येवर ठोस उपाय करत वाडी-वस्त्यांवर पथदिवे बसवून प्रकाशाचा मार्ग खुला केला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वृषाली वाळके आणि दिपक पवार यांच्या प्रचारासाठी आर बी जगदाळे पाटील अनोसेवाडीत गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी वाडी-वस्त्यांवरील प्रचंड अंधार असुन गावातील विजेच्या खांबावर पथदिवे नसल्याची व्यथा त्यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी हा “अंधार दूर करुन अनोसेवाडीत प्रकाश आणणार,” असे आश्वासन आर बी जगदाळे पाटील यांनी ग्रामस्थांना दिले होते.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही दिलेला शब्द विसरुन न जाता जगदाळे यांनी प्रत्यक्ष अनोसेवाडीत जाऊन पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण करुन दाखवले. या कामामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना आता अंधारातून मार्ग काढावा लागत नाही.

त्यामुळे ग्रामस्थांनी आर बी जगदाळे पाटील यांचे मनापासून आभार मानत, “राजकारणात शब्द पाळणारा नेता क्वचितच पाहायला मिळतो; पण जगदाळे यांनी कृतीतून विश्वास जिंकला,” अशी भावना व्यक्त केली.

निवडणुकीतील प्रचारापुरते आश्वासन न ठेवता प्रत्यक्ष काम करून दाखवणाऱ्या आर. बी. जगदाळे पाटील यांच्या या पुढाकारामुळे अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर खऱ्या अर्थाने प्रकाश पडला असून, विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.