मुंबई: गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली असून आता ‘येडं लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता विशाल निकमही विवाहबंधनात अडकला आहे. १० फेब्रुवारी रोजी विशालने अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली.
दोघांची ओळख ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतून झाली. त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये विशालने अक्षयाचा अनेकदा “माझी सौंदर्या” असा उल्लेख केला होता. काही दिवसांपूर्वी दोघांनी सोशल मीडियावर सुंदर व्हिडीओ शेअर करत आपलं नातं अधिकृत केलं होतं. आता त्यांनी उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
हरिद्वारमध्ये साखरपुडा केल्यानंतर या जोडीने पुराणात उल्लेख असलेल्या पवित्र त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली. हिंदू मान्यतेनुसार, याच ठिकाणी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. त्या पवित्र स्थळी लग्न करण्याची इच्छा विशाल-अक्षयाने पूर्ण केली.
लग्नानंतर विशालने अक्षयासाठी खास कविता शेअर केली. त्याने लिहिलं
“चंद्र भागेसारखं प्रेम आपल सखी
मी तुझ्यात सामावून जाईन
रुसली जरी तू रखुमाई सारखी
मी सावळा विठ्ठल होऊन जाईन
कायम तुझा रुसवा काढून
तुला आयुष्यभर मनवत राहीन”
ही भावनिक पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लग्नातील दोघांचा लूकही चर्चेचा विषय ठरला. अक्षयाने नारंगी आणि मेंदी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. हातात चुडा आणि साधे पण देखणे दागिने असा तिचा मोहक लूक पाहायला मिळाला. तर विशालने नारंगी ओढणी आणि मेंदी रंगाचं धोतर असा पारंपरिक पेहराव केला होता.
मोजक्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोशल मीडियावर मात्र चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.