मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये गुरू-शिष्याचं नातं आता थेट संघर्षाच्या वळणावर आलं आहे. मालिकेत भैरवी आणि सावली एकाच मंचावर आमनेसामने येणार असून, त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर तिला तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं. वझे घराण्याची गायन परंपरा जपण्यासाठी भैरवीने स्वतःच्या मुलीला गाणं येत नसतानाही सावलीकडून वर्षानुवर्षे गाऊन घेतलं आणि मात्र ताराला गायिका म्हणून जगासमोर सादर केलं. सारंगला हे सत्य समजताच त्याने सर्वांसमोर भैरवीचा पर्दाफाश केला.
या घटनेनंतर भैरवी एकटी पडली. तिने आपल्या शृंगाराचा त्याग करत सावली, सारंग, ऐश्वर्या आणि इतरांचा बदला घेण्याचा निर्धार केला. सावली आणि सारंग एकत्र येत भैरवीचे कारस्थान उधळून लावत असतानाच, आता भैरवीने सावलीला थेट जुगलबंदीचं आव्हान दिलं आहे.
जुगलबंदीत विषाचा डाव!
मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यात भैरवी आणि सावली एकाच मंचावर दिसत आहेत. भैरवी गाणं सादर करत असताना सावली पाणी पिते. मात्र, सावली गाऊ नये यासाठी भैरवीने मोठं षडयंत्र रचलेलं असतं. सावलीच्या वहिनीच्या मदतीने तिच्या पाण्यात औषध मिसळण्यात आलेलं दाखवण्यात आलं आहे.
भैरवीचं गाणं संपल्यानंतर ती सावलीला गाण्यास सांगते. मात्र सावलीच्या गळ्यातून सूर फुटत नाहीत. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. सावली गात नाही हे पाहून सारंग, त्याचे आई-वडील, जगन्नाथ आणि त्यांची पत्नी चिंतेत सापडतात. यावेळी भैरवी टोमण्यानं विचारते, “काय झालं सावली? गळ्यातून सूर फुटत नाहीत का?”हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने कॅप्शन दिलं आहे,“भैरवीच्या षडयंत्रामुळे होणार का सावलीचा पराभव?”
पुढे काय?
सावली का रडतेय? तिला पुन्हा गाणं गाता येईल का? भैरवीचा डाव उघडकीस येणार का? सावली भैरवीला प्रत्युत्तर देणार का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून, ‘सावळ्याची जणू सावली’ मधील पुढील भागांकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.