मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत अण्णामलाई; निवडणूक जबाबदाऱ्या सोडल्याने भाजपमध्ये खळबळ

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भाजप नेते के. अण्णामलाई पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अण्णामलाई यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडल्याची घोषणा केल्याने राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून प्रचारासाठी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे रोड शो आणि सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी “मुंबई ही महाराष्ट्राची नाही, तर आंतरराष्ट्रीय शहर आहे” असे वक्तव्य केले होते. या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा जाहीर समाचार घेत त्यांच्यावर टीका केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी अण्णामलाईंसाठी ‘रसमलाई’ असा शब्दप्रयोग केल्याने वाद अधिक चिघळला होता.

मुंबईतील दक्षिण भारतीय मतदारसंख्या अधिक असलेल्या भागांत अण्णामलाई यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला होता. यावरून राज ठाकरे यांनी त्यांना थेट लक्ष्य केले, तर अण्णामलाई यांनीही प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना आव्हान दिले होते.

माजी आयपीएस अधिकारी असलेले अण्णामलाई यांनी सरकारी सेवेला रामराम ठोकत भाजपमधून राजकीय कारकीर्द सुरू केली. जुलै २०२१ ते एप्रिल २०२५ या कालावधीत ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यात आक्रमक राजकारण केलं.

दरम्यान, तमिळनाडूत येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर अण्णामलाई यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अण्णामलाई यांनी कौटुंबिक कारणांमुळे ब्रेक घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या वडिलांवर सध्या कोईंबतूरमध्ये उपचार सुरू असून, त्यांच्यासोबत राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयाची माहिती प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपने अण्णामलाई यांच्याकडे सिंगनल्लूर, मदुराई दक्षिण, विरुगंबक्कम, कराईकुडी, श्रीवैकुंदम आणि पद्मनाभपुरम या सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. मात्र, आता त्यांनी या सर्व जबाबदाऱ्यांपासून माघार घेतली आहे.आपण विधानसभा निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर अण्णामलाई यांनी “याबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल” असं उत्तर दिलं आहे.