मुंबई: चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार अभिनयाच्या करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडतात. मात्र काही कलाकार असेही आहेत जे ग्लॅमरसोबत शिक्षणालाही तितकंच महत्त्व देतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला.
तेलुगू इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आणि सध्या बॉलिवूडमध्येही झळकू लागलेल्या श्रीलीलाने नुकतीच एमबीबीएसची पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे. सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिने डी. वाय. पाटील विद्यापीठातून डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं असून तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार झालं आहे.
श्रीलीलाच्या पदवीदान समारंभातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाल रंगाच्या पोशाखात ती पदवी स्वीकारताना दिसत असून चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनयातील व्यस्त वेळापत्रक सांभाळत तिने मेडिकलसारखा कठीण अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे तिच्या जिद्दीचं आणि समर्पणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
बालकलाकार म्हणून श्रीलीलाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘किस’ हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘धमाका’, ‘भगवंत केसरी’, ‘गुंटूर करम’, ‘मास जथरा’ अशा चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘पुष्पा 2’मधील ‘किसिक’ आणि ‘कुरची मडाथपेटी’ ही गाणीही प्रचंड गाजली. आता ती कार्तिक आर्यनसोबत ‘आशिकी 3’मध्ये झळकणार आहे.ग्लॅमर आणि शिक्षण यांचा सुंदर समतोल साधत श्रीलीलाने अनेक तरुणांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.