शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन गट एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदेवाडी येथील दोन गट जबाब नोंदवण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, पोलीस ठाण्याबाहेरच दोन्ही गटांमध्ये वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
महिला आणि पुरुषांच्या जमावाने एकमेकांवर दगडफेक करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भरदिवसा, तेही पोलीस ठाण्याच्या अगदी समोर हा सर्व प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
ज्या पोलीस ठाण्यात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, त्याच पोलीस ठाण्यासमोर अशा प्रकारे हाणामारी होत असेल, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय. या घटनेमुळे शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.