बिग बॉस मराठी’मध्ये राखीचा पुन्हा धडाका! रुचिता-रोशनसोबत जोरदार वाद, घरात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा

मनोरंजन

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून खेळाने वेगळीच दिशा घेतली आहे. तिच्या आगमनानंतर घरातील वातावरण अधिकच तापले असून सध्या सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान वादांचे सत्र रंगताना दिसत आहे.

टास्क संपल्यानंतर राखी सावंत पुन्हा एकदा स्पर्धकांना आरसा दाखवण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्वप्रथम कपडे धुण्याच्या कारणावरून राखी आणि रुचिता यांच्यात खडाजंगी होणार आहे. “माझ्याशी पंगे घेण्याआधी दहा वेळा विचार कर,” असा इशारा रुचिता राखीला देते. आता या वक्तव्यावर राखी काय प्रत्युत्तर देणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

दरम्यान, राखी आणि रोशन यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक रंगणार आहे. “तू घरात काहीच काम करत नाहीस. एकाही मुद्द्यावर बोलत नाहीस. तुम्हाला बिग बॉसचं घर पिकनिक वाटतंय का?” असा सवाल राखी रोशनला करते. यावर संतापलेल्या रोशनचं प्रत्युत्तरही तितकंच तीव्र असतं. “तुझ्याजागी मुलगा असता तर तो फुटला असता,” असं तो म्हणतो. त्यानंतर राखी त्याला थेट आव्हान देत, “आहे का तुझ्यात दम?” असा सवाल करते.

एकंदरित, आजच्या भागात राखी सावंत, रुचिता आणि रोशन यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कॅप्टन्सी टास्कनंतर घरातील समीकरणं बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.