शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरच्या बेट भागातील मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, सविंदणे परिसरात सातत्याने होणाऱ्या विजेच्या रोहित्रांच्या चोऱ्या व परिसरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या श्री येमाई माता सभागृहात (दि १२) जुन रोजी दुपारी ३ ते ४:३० वाजेपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक सुनील उगले, त्यांचे पोलीस सहकारी कर्मचारी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, शाखा अभियंता इंगळे व त्यांचे कर्मचारी, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून रामदास वळसे पाटील तसेच कवठे येथील अनेक ग्रामपंचायत सद्स्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

मलठण, कवठे येमाई , टाकळी हाजी, सविंदणे परिसरात वाढत्या डीपी,केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्यात आल्या असुन गावोगावी ग्रामसुरक्षा दल तात्काळ सक्रिय करण्यात येणार आहेत. तसेच परीसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर आता कडक व धडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी सांगितले.

 

या बैठकीस उपस्थित असणारे रामदास वळसे पाटील यांनी कवठे येथील अवैध दारु धंद्यांबाबत राज्य उप्तादन शुल्क विभागाचे पुणे विभागाचे अधिक्षक रजपूत यांच्याशी थेट संपर्क साधत येथील वस्तुस्थितीची त्यांना माहीती दिली. तर पोलिस व महावितरण यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात येत असून ग्रामसुरक्षा पथकाच्या मदतीने रोहित्राच्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले.तर कवठे गावात जोरदारपणे सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थितांसमोर अधिकाऱ्यांवर प्रश्नांची खैरात केली. यावर तात्काळ योग्य त्या उपाय योजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याने हि बैठक संपन्न झाली.

 

पोलिसांच्या हातून चोर पळाल्याची माहिती पत्रकारांना कोणी दिली…? 

बेट भागातील विद्युत रोहीत्र चोर शोधण्याऐवजी पत्रकारांना पोलिस स्टेशनमधील माहिती कशी मिळते हा प्रश्न शिरुर पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांना करत आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा पोलिस स्टेशनमध्ये रंगली आहे. पोलिस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती पत्रकारांना दिली जात नाही. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत काहीचं गुन्हे घडतच नाही असे पोलिसांकडुन वरिष्ठाना दाखवले जाते. एखाद्या गुन्ह्याबाबत माहिती विचारली असता पत्रकारांना कुठलीही माहीती दिली जात नसल्याने सगळ्याच पत्रकारांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.

 

हद्दीतील अवैध धंद्याबाबत मात्र पोलिस निष्क्रिय…? 

शिरुर शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदयांचा तसेच विद्युत रोहित्र चोरटयांचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर उपाययोजना करायचे सोडुन स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पत्रकारांना विविध गुन्ह्यांची माहीती कशी मिळते यावर चर्चा करत आहेत. आता वारंवार घडणाऱ्या विद्युत रोहीत्र चोरटयांकडे व अवैध धंद्याकडे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नुकतीच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शिंदोडी येथून माती वाहतुक करणारे तीन ट्रक्टर पकडून कारवाई केली आहे. मग शिरुर पोलिस नक्की काय करतात…? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.