शिरूर शहरातील अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या त्या कॅफेवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील तरुण -तरूणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या ‘द स्टीम रुम’ या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आकाश रमेश लभडे (वय २३) रा. अरणगाव ,ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर असे या कॅफे चालकाचे नाव आहे.

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व परिसरातील शाळेतील तसेच कॉलेजमधील मुले मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देण्यासाठी ‘द स्टीम रुम’ या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन केले असुन त्यामध्ये काही शाळकरी मुले व मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर कॅफेवर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिले होते.

त्यानुसार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रविंद्र आव्हाड हे साध्या वेशात शिरूर शहारामधील रेव्हेन्यु कॉलनी येथील या कॅफेमध्ये जावुन नाष्टा ऑर्डर देवुन बसले असताना तेथे काही मुले व मुली कॅफे चालकाने पार्टेशन केलेल्या रूममध्ये बसुन असभ्य व अश्लील कृत्य करताना आढळून आले तसेच अजुन काही शाळकरी मुले व मुली देखील तेथे येत असल्याचे दिसुन आले . कॅफे चालक आकाश रमेश लभडे (वय २३) रा. अरणगाव, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर १५६/२०२५ भा. न्या .संहिता कायदा कलम २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याबाबत पोलीस अमंलदार रविंद्र बापुराव आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करीत आहेत.

या कॅफेवर फेब्रुवारी महिन्यात यापुर्वी देखील शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी दुसरा चालक होता. आता पुन्हा याच कॅफेमध्ये पार्टिशन करून शाळेतील, कॉलेजमधील तरुण तरुणींना अश्लील वर्तन करण्यासाठी जागा निर्माण करून भाड्याने देण्यात आली होती. शिरूर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना आपले गाळे भाड्याने देत आहेत. त्यांना याबाबत माहिती असूनही भाड्यापोटी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा गाळेमालकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे त्यामुळे गाळा भाड्याने देताना लोक विचार करतील.