shirur-bus-fire

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून पुर्णपणे खाक झाली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. शुक्रवारी (ता. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.

पिंपरी-चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस (क्र. एमएच ०७ सी ७२८७) चाकण येथून ऑईलचे बॅरेल व काही स्पेअर पार्ट भरून छत्रपती संभाजीनगर येथे चालली होती. ही बस बोऱ्हाडे मळ्याजवळ आली असताना मागील बाजूने गरम वाफा येऊ लागल्याने चालक सत्यवान उत्तम तळेकर यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यावेळी मागील बाजू ज्वाळांनी वेढल्याचे त्यांना दिसल्याने त्यांनी उडी टाकून मदतीसाठी आसपासच्या नागरिकांना मदतीसाठी हाका मारल्या.

मात्र, ऑईलसह इतर ज्वलनशील पदार्थ या बसमध्ये असल्याने आगीचे मोठे लोळ उठले होते. त्यामुळे कुणीही पुढे जाण्याचे धाडस केले नाही. दरम्यान, शिरूर पोलिसांना सदरची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी रांजणगाव एमआयडीसी व शिरूर नगर परिषदेशी संपर्क साधल्यानंतर तेथील आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शिरूरमधील सागर वॉटर सप्लायर्स, संपत दसगुडे यांनीही ट्रॅक्टरला जोडलेल्या पाण्याच्या टँकरने पाण्याचा मारा केला. मात्र, या कार्गोमधीलऑईलमुळे सुमारे दीड तासाहून अधिक काळ आग भडकत होती. त्यामुळे कार्गो जळून खाक झाली. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी कार्गोचा केवळ सांगाडाच उरला होता.

दरम्यान, आगीचे लोळ परिसरात उठत असल्याने पुणे-नगर महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विस्कळित वाहतूकीमुळे आगीचे बंब घटनास्थळी पोचण्यासही विलंब झाला. आग आटोक्यात आणल्यानंतर उरलेला सांगाडा बाजूला करण्यातही बराच वेळ गेला. त्यामुळे सकाळी साडेनऊपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी पोलिस पथकासह वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले आहेत.

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरुर एस टी आगारातील महिला प्रसाधनगृहाची दुरावस्था; रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण