शिरूर तालुक्यातील ऍट्रॉसिटी व मारहाणीच्या गुन्हयातून आरोपींची निर्दोष मुक्तता

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील केंदूर या गावातील एका व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी आलीदर प-हाड, बाळू प-हाड, नवनाथ पहाड व दत्तात्रय प-हाड यांची पुणे येथील विशेष न्यायाधिश संजीवकुमार नरवाडे यांनी गुणदोषावर चौकशी करून निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, तक्रारदाराने माझे शेतजमीनीवर गुरे का चारता असे विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी तक्रारदारास व त्याच्या पत्नीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याबाबत आरोपीविरूध्द शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेनुसार तकार नोंदविलेली होती. सदर तक्रारीनुसार पुणे येथील विशेष न्यायालयामध्ये दाखल असलेल्या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये स्वतः तक्रारदार, त्याची पत्नी, पंच, वैद्यकिय अधिकारी तसेच तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपींनीही त्यांचे बचावासाठी साक्षीदार तपासले होते.

आरोपींनी तक्रारदार याने जमीनीचे तसेच पाण्याचे पाईपलाईनचे वादातून खोटी तक्रार दाखल केलेबाबतचा बचाव मे. न्यायालयासमोर मांडलेला होता व त्याबाबत पुरावे सादर केलेले होते. आरोपीतर्फे वकीलांनी तपासादरम्यान झालेल्या त्रुटी तसेच साक्षीदारांचे उलटतपासामध्ये झालेली तफावत प्रभावीपणे मांडलेल्या होत्या. आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राहय धरून तसेच सबळ पुराव्याअभावी मा. विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आरोपीतर्फे सदर खटल्याचे कामकाज अॅड. जयसिंग पडवळ, अॅड. उदय सरोदे, अॅड. अभिषेक बाफणा, अॅड. स्वप्नील कापरे यांनी पाहीले.

खोटे गुन्हे न्यायालयात टिकत नाहीत; ऍड. उदय सरोदे

जमीनीचे तसेच इतर वैयक्तिक वादातून अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ या कायद्याखाली खोटे गुन्हे दाखल करून कायद्याचा दुरूपयोग होत असून प्रस्तुतचे निकालातून निरपराध इसमांना न्याय मिळालेला आहे. तसेच न्याय व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास वृध्दींगत होत असल्याचे मत ऍड. उदय सरोदे यांनी व्यक्त केले.