शिरुर (तेजस फडके) काही लोकांनी मत मागताना राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितली. मात्र त्यानंतर सत्ता आल्यावर आपल्या पक्षाच्या चिन्हासह काही लोकांनी पलायन केल. राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेस फुटला तेव्हा महाराष्ट्र राज्यातुन जे पाच सहा आमदार आमच्या पाठीमागे मजबुतीन उभे राहिले. त्यात अशोक पवारांचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामती येथील शरद पवार यांच्या ‘गोविंद बाग’ येथील निवासस्थानी महाविकास आघाडीचे शिरुर-हवेलीचे उमेदवार अॅड अशोक पवार यांच्या माध्यमातुन शिरुर-हवेलीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
महाराष्ट्रात अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातुन मदत करण्यात आली. त्यामुळे अनेक कारखाने सुरु व्हायला मदत झाली. परंतु तुमच्या घोडगंगा साखर कारखान्याबाबत मात्र वेगळी भुमिका घेत इतर कारखाने चालु करण्यासाठी जे कर्ज उपलब्ध करुन दिले गेले. ते कर्ज मात्र घोडगंगाला नाकारण्यात आले. शिवाय घोडगंगा बंद कसा पडेल यासाठी प्रयत्न केले गेले.
घोडगंगा बाबत शरद पवारांचं सुचक वक्तव्य….
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असुन हे सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याने शिरुरकरांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही,तेच मी पाहतो असा ठाम विश्वास शरद पवार यांनी शिरुरकरांना दिला.
शिरुर तालुक्याचा सर्वोत्तम विकास करण्यासाठी व येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आशिया खंडातील सर्वोत्तम औद्योगिक वसाहत मी शिरुर तालुक्यात आणली. शेतीला मुबलक पाणी मिळण्यासाठी डिंभे आणि चासकमानचे पाणी शिरुर तालुक्यात आणले. त्यात अशोक पवारांच्या विकासकामांच्या जोरावर तालुका आज प्रगतीपथात आघाडीवर आहे. सध्या विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. मात्र तुम्ही याची काळजी करू नका. मी घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करूनच दाखवतो.
यावेळी कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, हवेलीचे तालुकाध्यक्ष संदीप गोते, सुलभा उबाळे, राजेंद्र सातव, प्रदिप कंद, सतीष कोळपे, सुभाष कोळपे , अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शिरुर तालुक्यात मलिदा गॅंग सक्रिय…?
शिरुर तालुक्यातील विकास कामांना दृष्ट लावण्यासाठी तालुक्यात मलिदा गॅंग सक्रिय झाली आहे. हि मलिदा गॅंग फक्त स्वतःचा राजकीय फायदा तसेच स्वतः च्या व्यवसायांचे अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांना जाऊन मिळाली आहे. यांच्याकडे सर्वसामान्य जनतेसाठी कसलेही विकासाचे व्हिजन नाही. हि मलिदा गॅंग गावोगावी जाऊन तरुणांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या ‘मलिदा गॅंग’ पासुन तरुणांनी सावधानता बाळगावीअसे आवाहन महाविकास आघाडीचे शिरुर-हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांनी केले.