शिरुर तालुक्यातील मलठण येथे अंधश्रद्धेपोटी अघोरी प्रकार

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मलठण येथे मलठण – शिरुर रोडवरील एम.आर. एफ.टायर शोरुमच्या समोरील बाजूस जागा मालक नागेश दत्तात्रय महामुनी यांच्या नवीन पाया बांधकाम असणाऱ्या भिंतीवर गुलाल, लिंबू, टाचण्या, नारळ असे वाहून जादूटोण्याचा अघोरी प्रकार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

नारळ, लिंबे, कापड व अघोरी कृत्य करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर साहित्याचा या अघोरी कृत्यासाठी वापर करण्यात आला असून गुरुवारी (दि. १७) रोजी सकाळी ही घटना उघड झाली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तिंनी हा सर्व जादू टोण्याचा प्रकार केला आहे. असे अघोरी कृत्य करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी किरण देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे. अशा प्रकारांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता त्याविरुद्ध जनजागृती करुन असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.या प्रकारामुळे मलठण येथे एकच खळबळ उडाली आहे.

काही वर्षापूर्वीही मलठण, कवठे येमाई (ता. शिरुर) येथेही काही वर्षापूर्वी असाच प्रकार घडला होता तोही उघडकीस आला नाही. असा प्रकार करणाऱ्यांविरुद्ध त्यांना वेळीच शोधून त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.