पोलीस असल्याचे भासवत युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील SBI चौकामध्ये एक मुलगी तिच्या मित्रासोबत सेल्फी काढत असताना एका व्यक्तीने त्या दोघांना आपण पोलिस असल्याचे सांगुन मला तुमची तपासणी करायची आहे असं सांगुन बंद पडलेल्या कोविड सेंटर मध्ये नेले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत त्यांचा मोबाईल काढुन घेत मुलीचा विनयभंग करुन अंधाराचा फायदा घेत पळ काढला होता.या गुन्ह्यात रांजणगाव MIDC पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

रांजणगाव MIDC तील SBI चौकात दि. 21 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास फिर्यादी मुलगी तिच्या मित्रासोबत सेल्फी काढत असतांना एका स्कुटी गाडीवरुन एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि मी पोलीस असल्याचे सांगुन “तुम्ही येथे फोटो का काढता, मला तुमची तपासणी करायची आहे” असे म्हणुन फिर्यादी आणि तिच्या मित्राला बंद पडलेल्या कोवीड सेंटरमध्ये घेवुन गेला. त्यावेळी या व्यक्तीने त्यांना तो रांजणगाव पोलीस ठाण्यात ड्युटीला असल्याचे सांगुन दोघांना हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीकडील मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेतला.

त्यावेळी फिर्यादी व तिच्या मित्राने त्या व्यक्तीस “आमची चुक झाली, पुन्हा असे होणार नाही” असे म्हणुन सोडण्याची विनवणी केली. परंतु त्या व्यक्तीने त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन फिर्यादीचा हात धरुन जवळ ओढुन फिर्यादीचे अंगावरुन हात फिरवुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी फिर्यादी आणि तिच्या मित्राला ती व्यक्ती पोलीस नसल्याचा संशय आल्याने त्यांनी “आम्हाला पोलीस स्टेशनला घेवुन चला” असे म्हणाले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हा आरोपी त्याच्याकडील स्कुटी मोटार सायकल तेथेच सोडुन पळुन गेला.

त्यानंतर सदरचा प्रकार फिर्यादी आणि तिचा मित्र यांनी पोलीस स्टेशनला येवुन सांगीतला असता या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द जबरी चोरी, विनयभंग, तोतयागीरी करणे, तोतयगीरी करुन ठकवणुक करणे, मारहाण करणे इत्यादी बाबत गुन्हा दाखल केला. या गुन्हयातील आरोपीचा तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी तांत्रीक व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला असता सदरचा गुन्हा अमित बबन अरोटे (वय 37 वर्षे) रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर याने केला असल्याचे निष्पन्न झाले असुन दि. 22 जानेवारी 2023 रोजी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश मिट्टे, अप्पर शिरुर विभागाचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ज्ञानेश्वर शिंदे,पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस नाईक तेजस रासकर, अभिमान कोळेकर यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे हे करत आहेत.