शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा अशी चर्चा नागरीक करत असुन या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले आहे.
मंगळवार (दि ३०) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास प्रसुती झालेल्या महिलेवर उपचार न घेताच कंटाळून घरी परतण्याची दुर्दैवी वेळ आली. हा प्रकार कवठे येमाई येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी वैद्यकीय अधिका-यांना संपर्क केला. परंतु संपर्क न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त होत रुग्णालयाला टाळे ठोकल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि १) मे रोजी माजी पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे व ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी लवकरच कायमस्वरुपी नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे खोलण्यात आले.
कवठे येमाई (ता.शिरूर) हे परिसरातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. परिसरातील ग्रामस्थ आठवडे बाजार, बँक, दवाखाना तसेच इतर कामांसाठी येथे येत असतात. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी रुग्णांची विशेषतः वयोवृद्धांची नेहमीच रीघ लागलेली दिसून येते. मात्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी ‘असुन अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहे. येथे तीन वैद्यकीय अधिकारी असुन ते नियमित हजर नसतात.
विशेषतः सायंकाळच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी येथे निवासी राहत नसल्याने प्रसुती,अपघात यांसारख्या उपचारांसाठी रुग्णांना नाईलाजाने खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोर-गरीब रूग्णांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांच्या खिशाला कात्री
कवठे येमाईत प्राथमिक आरोग्य केंद्र असून वरूडे, मोराची चिंचोली, सविंदणे, कान्हूर मेसाई या गावांवरून नागरिक उपचारासाठी येथे येतात. परंतु पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही.निवासस्थान वापराविना धुळ खात पडले असून त्यामध्ये मोडक्या खुर्चा अस्ताव्यस्त पडल्या आहे. विद्युत केबलची ही दुरावस्था झाली असुन यामुळे कधीही आग लागु शकते. डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. गोरगरीब रुग्णांना उपचार घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
आरोग्य केंद्र दुरुस्तीचे काम संथगतीने, सुविधांची वानवा
कवठे येमाई येथील आरोग्य केंद्र दुरुस्तीचे काम गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासुन संथगतीने सुरु असल्याने येथील शस्त्रक्रिया विभाग बंद असून प्रसुती कक्षातील व अन्य विभागातील साहित्य बंद पडल्याने नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला असून, अद्याप जुन्या साहित्यांची दुरूस्ती अथवा नवीन साहित्य उपलब्ध झाले नसल्याचे आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांकडून सांगण्यात आले.
मंगळवारी प्रसुती झालेली महिला उपचार घेण्यासाठी आरोग्य केंद्रात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने तिला उपचार न घेता घरी परतावे लागले. हि माहिती समजताच आम्ही वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क केला परंतु, संपर्क झाला नाही. वारंवार असे प्रकार होत असल्याने आम्ही आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.”
किसन हिलाळ
ग्रामस्थ
कवठे येमाई आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी लवकरच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच याबाबत आरोग्य उपसंचालक यांची भेट घेणार आहोत.
डॉ सुभाष पोकळे
माजी पंचायत समिती सदस्य
कवठे येमाई येथील घटनेबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे ते अधिक माहिती देऊ शकतील. त्यांच्याशी संपर्क करा.
डॉ सचिन देसाई
जिल्हा आरोग्य अधिकारी
कवठे येमाई येथील आरोग्य केंद्राशेजारी मंगळवारी आग लागली होती. त्यामुळे रूग्णांना इजा होऊ नये म्हणून टाळा लावला होता. अशी माहिती समजली. सध्या दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून ओपीडी सुरू आहे. ग्रामस्थांनी टाळा लावला होता याबाबत मला कोणतीही माहिती नाही. आरोग्य केंद्र दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. त्यासाठी केंदूर या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जात आहे.”
डॉ राजेश कट्टीमणी
प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी