पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या गळ्यावर खोल जखम तसेच चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हि घटना शुक्रवारी (दि १७) दुपारी 3:30 च्या वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पिंपळे जगताप गावच्या पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांना गावातील पाषाण तलावाच्या पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच शिक्रापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तलावाच्या पश्चिम बाजुला पाण्यात पालथ्या अवस्थेत संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

संबंधित मृतदेहाची प्राथमिक पाहणी केली असता तरुणाच्या गळ्यावर गंभीर आणि खोल स्वरुपाची जखम असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या चेहऱ्यावरही मारहाण अथवा अन्य प्रकारच्या दुखापतींच्या खुणा आढळल्या. त्यामुळे संबंधित तरुणाचा केवळ पाण्यात बुडून किंवा अपघाताने मृत्यू झाला नसून, त्याचा गळा आवळून अथवा गळ्यावर वार करुन खून करण्यात आला असावा, असा संशय अधिक बळावला आहे.

खून केल्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाषाण तलावाच्या पाण्यात फेकण्यात आला असण्याची शक्यताही पोलिसांकडून तपासली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृताच्या अंगावरील कपडे, शरीरावरील खुणा तसेच परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींच्या आधारे त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणी पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताची ओळख पटविणे, त्याचा खून नेमका कुठे आणि केव्हा करण्यात आला, मृतदेह तलावात कोणत्या वाहनातून आणण्यात आला तसेच या हत्येमागील नेमके कारण काय, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, संबंधित पोलीस ठाण्याचे तपास पथक, तांत्रिक विश्लेषण पथक आणि अन्य यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात असून, मागील काही दिवसांत परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती संकलित केली जात आहे. तलावाकडे येणारे प्रमुख रस्ते, संशयित वाहने आणि मोबाईल लोकेशनच्या आधारेही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

मृताची ओळख पटवून खुनामागील कारणाचा उलगडा करणे आणि आरोपींना जेरबंद करणे, हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. या थरारक घटनेमुळे पिंपळे जगतापसह परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत