मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या पहिल्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे ‘स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान’ तसेच ‘देवगिरी ते देवराई’ राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाच्या नामफलकाचे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून शासन, उद्योग, सामाजिक संस्था आणि जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडू शकतो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रेरणेला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कन्हेरी येथील ५५ हेक्टर राखीव वनक्षेत्रात विकसित होत असलेल्या पर्यटन उद्यानासाठी आतापर्यंत ८.७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, येथे सस्पेन्शन ब्रिज, सोलार पार्क, रॉक गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आले आहे. देशी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचे कौतुक करत सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, हे अभियान केवळ शासनाचे नसून संपूर्ण समाजाचा सामूहिक संकल्प आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, मुंबई पोर्ट ऑथॉरिटी, सह्याद्री देवराई फाउंडेशन, विविध CSR संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
बदलते हवामान, वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे वनसंपदा धोक्यात आली असून, ‘देवगिरी ते देवराई’ हे अभियान केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, जनजागृती आणि शाश्वत विकासाची व्यापक चळवळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.