रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील बाबुराव नगरमध्ये ड्रेनेज तुंबले; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग ग्रामपंचायत अंतर्गत बाबुराव नगर येथील शिवसाई मंगल कार्यालयाच्या शेजारील ड्रेनेज तुंबल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तुंबलेल्या ड्रेनेजमधून घाण पाणी बाहेर पडून थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे.

दररोज सकाळ-संध्याकाळी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना या घाणीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सततच्या या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, पोटाचे विकार यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली असून स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

येथील स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “ग्रामपंचायतीने तातडीने ड्रेनेज लाईनची साफसफाई करून परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष घालून उपाययोजना न केल्यास येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन महसूल विभागाची निष्क्रीयता; ग्रामस्थांचा संताप

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन,महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत…?