शिरुर (तेजस फडके): आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे गावात मैत्रीचा धडा देत कुत्र्यांच्या धाडसाने बिबट्यालाही घाबरवलंय…! कुत्र्यांच्या निडर मैत्रीसमोर बिबट्यालाही माघार घ्यावी लागली. कुत्रा एकटा जखमी झाला तरी दुसऱ्या सहकाऱ्याने दिलेलं बळ, ही खरी मैत्रीची ताकद सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पिंपळगाव घोडे येथील शेतकरी महादेव जगदाळे यांच्या घरासमोर दबक्या पावलांनी शिकारीच्या शोधात बिबट्या आला अन रखवालीसाठी असलेला कुत्रा अचानक समोर आला आणि बिबट्याशी जीवघेणी झुंज सुरु झाली बिबट्याच्या तीक्ष्ण नखांनी आणि दातांनी कुत्र्याला जखमी केलं. पण कुत्र्याने हार मानली नाही. कारण पिंजऱ्यात अडकलेला दुसरा सहकारी कुत्रा हंबरडा फोडून त्याला धीर देत होता.
तु एकटा नाहीस… मी आहे तुझ्या सोबत…अशी जणू ती मैत्रीची हाक जखमी कुत्र्याला बळ देत राहिली अखेर मैत्रीच्या या नात्याची ताकद इतकी प्रचंड होती की बिबट्यालाही मागे हटावं लागलं धुम ठोकावी लागली…हा थरार आणि भावनिक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून,प्राण्यांच्या या नि:स्वार्थ मैत्रीने प्रत्येकालाच एक धडा दिला आहे.