शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

मुख्य बातम्या राजकीय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक आणि कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे केंद्रिय कार्याध्यक्ष आणि संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे उपस्थित होते.

 

स्वप्नील गायकवाड यांनी यापुर्वी कोंढापुरी गावचे सरपंच म्हणुन काम केले असुन त्यांची (शरद पवार गट) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील स्वर्गीय अरुण (आबा) गायकवाड यांच्याही ऋणानुबंधास उजाळा मिळाला असून दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या सहकारी स्वर्गीय अरुण (आबा) गायकवाड यांच्या मुलाला हे पद मिळाल्याने जुने कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, निमोणे गावचे सरपंच श्याम काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक संजय काळे, विजय ढमढेरे, विनय गायकवाड,योगेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

या निवडीनंतर बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट) पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी सांगितले की, आगामी काळात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पक्षातील वरिष्ठ तसेच आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून ग्रामीण भागात पवार साहेबांच्या विचारांच्या समर्थकांना जोडण्याचे व पक्ष विस्तार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करणार आहे.