शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परीसरात एक हादरवून सोडणारी धक्कादायक घटना बुधवारी दि. o८रोजी सायंकाळी उघडकीस आली. जुन्या वादातून मित्रानेच आपल्या साथीदाराचा निर्घृण खून केल्याची घटना शिरूर शहरातील पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील गंगानगर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
या घटनेत संतोष मारुती ढोबळे (वय २१, रा. वाडा कॉलनी, शिरूर, मूळ रा. असोला ढोपळा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.
पोलिस हेल्पलाइन ११२ वर शिरुरच्या गंगानगर परिसरातील झुडपांमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीमाभिंतीलगत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची ओळख त्याच्या खिशात सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रे व छायाचित्रावरून पटली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
प्राथमिक चौकशीतून समोर आले की, मृत संतोष ढोबळे याचे संशयितांशी मैत्रीचे संबंध होते; मात्र अलिकडे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. एका जुन्या वादातून रागाच्या भरात मित्रांनीच त्याला शिरूर बायपासजवळ बोलावून घेत धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून, ‘मित्र’ या नात्याची मर्यादा ओलांडणारी ही हृदयद्रावक घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अशा घटनेंमुळे शिरूर परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, दुचाकी चोऱ्या,विद्युत रोहीत्र,विद्युत मोटारी चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.त्यामुळे असे वारंवार होणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर अंकुश मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गंभीर गुन्हे वारंवार घडतच राहतील.