पर्यावरणाची मोठी हानी, नागरिकांच्या जीवाला धोका, प्रशासन मूग गिळून गप्प
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावात (दि. २२) एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व रबरसदृश्य घातक कचरा बेकायदेशीररित्या जाळण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात विषारी धुराचे लोट पसरले असून, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांना सजग नागरिकांकडून याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याचा पाठपुरावा सुरू केला. व्हिडिओ पुराव्यांसह त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांना व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. दुर्दैवाने, एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही . ना फोन उचलला, ना संदेशांना उत्तर दिले. हा प्रशासनाचा निर्लज्ज दुर्लक्षाचा कळस म्हणावा लागेल.
शेवटी वाळुंज यांनी डायल ११२ वर संपर्क करून मदत मागितली. टाकळी हाजी पोलिस चौकीचे भाऊसाहेब ठोसरे यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक घातक कचरा आढळून आला. स्थानिक नागरिकांचा संशय आहे की, या प्रकरणात औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या आणि स्थानिक व्यक्तींचा हात आहे.
सामाजिक कार्यकर्ते वाळुंज म्हणाले, “कायद्यांचा बडगा केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणीचा पूर्ण अभाव दिसून येतो. त्यामुळेच असे गंभीर प्रकार उघडपणे घडतात.”याप्रकरणी लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार सादर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीनेही पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचे ठरवले आहे.
या घातक प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पर्यावरण व आरोग्याचा विचार करता प्रशासनाने तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मुख्यमंत्री व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
निलेश मंदा यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)