टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे पुन्हा वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील काही गावांमध्ये हे प्रकार सुरू असून, पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलठण परिसरात दिवसा ढवळ्या जुगाराचे फड सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच काही ठिकाणी हातभट्टी दारू, ताडी आणि धाब्यांवर देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री सुरू असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. यामुळे परिसरातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पंचायत समिती शिरूर येथे झालेल्या एका बैठकीत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही बेट भागातील काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आरोप होत असल्याने नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने धडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत