प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

क्राईम मुख्य बातम्या

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): सोशल मीडियावरून ओळख वाढवत एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी साहील दगडू शेख (रा. ठिकेकरवाडी, ता. जुन्नर) याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरोपीने तरुणीला आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर परिसरात बोलावून तिचे फोटो व व्हिडिओ काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावले. शिरूर परिसरातील एका निर्जन ठिकाणी तसेच जुन्नर तालुक्यातील त्याच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तलवार दाखवून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये आरोपीने तरुणीला पारनेर तालुक्यातील म्हसे येथे तसेच इतर ठिकाणी नेले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. पुढे जानेवारी २०२६ मध्ये दिल्ली येथे कथित विवाह प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारून निकाह करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याशिवाय तरुणीच्या घरातील सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घेतल्याचा आरोप असून, आरोपीच्या कुटुंबीयांनी मानसिक व शारीरिक त्रास देत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विरोध केल्यास फोटो व व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी साहील दगडू शेख, युनूस पठाण (पूर्ण नाव माहिती नाही), तसेच साहीलची आत्या व चुलती यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), ८७, ३०५, ३५१(२)(३), ३(५) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत