शिरूर (नितीन थोरात): “Run For Her” या उपक्रमाच्या निमित्ताने शिरूर येथील गंगा एज्युकेशन सोसायटी व Healing Lives या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातील शौर्यगाथा अनुभवलेल्या, वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी परमवीर चक्राने सन्मानित झालेले कारगिलवीर योगेंद्रसिंह यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
गंगा एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात योगेंद्रसिंह यादव यांनी बालपणापासून सैन्यात जाण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपल्या शब्दांत उलगडला. “१४० कोटी देशवासीयांचा सैनिकांवर जो विश्वास असतो, तोच आम्हाला सीमेवर छातीचा ढाल करून शत्रूशी लढण्याची ताकद देतो,” असे सांगताना त्यांनी वेळेचे महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले, “जीवनात उद्याची वाट पाहू नका, जे करायचे आहे ते आजच करा.”कारगिल युद्धातील आठवणी सांगताना त्यांनी उणे ५० अंश तापमानातील दुर्गम भागात भारतीय सैन्याने शत्रूशी दिलेल्या लढ्याचे थरारक वर्णन केले. आपल्या डोळ्यांसमोर सहकारी शहीद होत असतानाचा तो क्षण, स्वतःच्या शरीरावर झालेल्या गोळ्यांच्या जखमा आणि सुदैवाने मिळालेले जीवन—या साऱ्या आठवणींनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. आजही आपण शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले.
२६ जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिन म्हणून साजरा करतो, असेही त्यांनी नमूद केले.या प्रसंगी गंगा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कारगिलवीर योगेंद्रसिंह यादव यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर Healing Lives या सामाजिक संस्थेच्या श्रीमती जान्हवी विश्वनाथन यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या संस्थापिका जाई ताई खामकर (१००% अंध) यांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर परिसरातील माजी सैनिक, डेक्कन एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य श्री. समीर ओंकार, तसेच गंगा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद उपस्थित होते.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती, शौर्य आणि जीवनमूल्यांचा जिवंत धडा ठरला.