मुंबई: कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विश्वासराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशावेळी शिरोली दुमला गावचे सरपंच सचिन पाटील, हनुमान दूध संघ, महेचे अध्यक्ष बुद्धिराज शंकर पाटील महेकर, यशवंत सहकारी बँक कुडित्रेचे संचालक नंदकुमार अण्णासाहेब पाटील, तसेच अनिल सोलापूरे, राहुल पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी झाले.
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या विश्वासराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाली असून, सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि संघटनात्मक कौशल्य पक्षाच्या वाढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांचीही उपस्थिती होती.