हिवरे कुंभारच्या बालचामुंनी भरविला आठवडे बाजार

शिरूर तालुका

शालेय मुलांनी केली चक्क पन्नास हजारांची उलाढाल

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतच आठवडे बाजार भरवला होता तर यासाठी ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी देखील मुलांना भेट देऊन चांगला प्रतिसाद देत मुलांचे कौतुक केले असून मुलांनी देखील या बाजारात चक्क 50 हजार रुपयांची उलाढाल केली आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांकडून मुख्याध्यापक शुक्ररास पंचरास यांच्या मार्गदर्शनाखाली मकरसंक्रांत च्या निमित्ताने आठवडे बाजार भरविण्यात आला होता. मुलांना व्यावहारिक ज्ञान, नफा तोटा यासंदर्भात माहिती मिळावी यासाठी हा बाजार भरविण्यात आला होता. तर भरविण्यात आलेल्या या आठवडे बाजारात मुलांनी चक्क बाजारात मिळणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे भाजीपाला, खाद्य पदार्थ, कडधान्ये, घरगुती वापरातील वस्तू यांसह आदी वस्तू मोठ्या प्रमाणात आणलेल्या होत्या. मुले मोठमोठ्याने वस्तूंची नावे घेऊन हे घ्या, ह्या भावाने घ्या, असे ओरडत होती त्यामुळे यावेळी शाळेस अक्षरशः बाजाराचे स्वरुप प्राप्त झाले होते.

यावेळी सर्व महिलांसह ग्रामस्थांनी देखील मुलांच्या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद देत अनेक वस्तू खरेदी करून मुलांना प्रतिसाद दिला. मुलांनी भरविलेल्या बाजारास अनेक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या व मुलांचा इतक्या चांगल्या स्वरुपात राबविलेला उपक्रम पहावयास मिळाला असल्याचे उपस्थित मान्यवर व पालकांनी सांगत शिक्षक व विध्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक व ग्रामस्थांनी बाजारत भेट देत मुलांना शुभेच्छा देत खरेदीचा आनंद लुटला. तर मुलांचा हा अनोखा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शुक्ररास पंचरास यांसह आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.