रांजणगावचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले एकाचे प्राण

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शेजारी राहणाऱ्या महिलेशी बोलला म्हणुन एका व्यक्तीने त्याचा गळा कापला. जिवाच्या आकांताने पळत त्याने मुख्य रस्ता गाठला आणि त्या रस्त्यावर असलेल्या एका चिकन दुकानादाराला त्याने जीव वाचविण्याची विनंती केली. त्या दुकानदाराने एका एका क्षणाचाही विलंब न करता मित्राच्या मदतीने दवाखान्यात नेले. पण गळ्याला झालेली जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्या दुकानादाराने त्याला रस्त्यात तसाच सोडत पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सगळी परिस्थिती सांगितली. पोलिसांनी तातडीने त्याला खाजगी दवाखान्यात नेत प्रथोमचार केले आणि पुढील उपचारासाठी तातडीने पुण्यात सरकारी दवाखान्यात पाठवल्याने एका युवकाचा जीव वाचला आहे.

हा प्रसंग कोणत्याही चित्रपटातला नाही तर शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील असुन रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्या प्रसंगावधानाने एका विकास कुमार नावाच्या सर्वसामान्य व्यक्तीचा जीव वाचला आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास कुमार सध्या रा. फलकेमळा, कारेगाव ता. शिरुर, जि. पुणे (मूळ रा. पांडेवार, ता. बाजगाव, जि गोरखपुर, उत्तरप्रदेश) हा रांजणगाव MIDC त कामाला असुन 18 सप्टेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कामावरुन रात्री 8:30 च्या सुमारास रुमवर आला. शेजारीच राहत असलेल्या महिलेला ‘भाभी खाना खाया क्या…?’ असे म्हणाला. त्यानंतर लगेचच आरोपी प्रशांत रमेश सरोदे रा. फलकेमळा, कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे (मूळ रा.पूर्णा सिद्धार्थनगर, ता. पूर्णा जि. परभणी)याने विकास कुमार याच्या गळ्यावर लोखंडी कटरने वार केला.

त्यानंतर घाबरलेल्या विकास कुमारने आपला गळा एका हाताने दाबत पुणे-नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या संदीप आपाजी आढाव (वय 40) याच्या चिकनच्या दुकानात धाव घेत संदीप याला आपला जीव वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर संदिपने एका क्षणाचाही विलंब न करता रुपेश बालाजी कांबळे या मित्राच्या मदतीने विकासकुमार याला दुचाकीवर बसवले आणि उपचारासाठी कारेगाव येथील खाजगी दवाखान्यात नेले. परंतु विकासकुमारच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने दोन खाजगी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे संदीप आढाव याचा नाईलाज झाला. त्याने जखमी विकास कुमारला तसाच रस्त्यावर टाकुन पळत जाऊन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन गाठले. त्यावेळेस ड्युटीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला.

पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी प्रसंगावधान राखत विकासकुमार याला कारेगाव येथील खाजगी डॉक्टरांकडे नेले आणि त्याच्यावर प्रथोमपचार करत 108 नंबरला फोन करुन पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून वैद्यकीय रुग्णालयात पाठवले. पोलिस निरीक्षक विनोद शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे विकास कुमार याला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी मदत झाली आणि त्याचा जीव वाचला. आरोपी प्रशांत रमेश सरोदे रा. फलकेमळा, कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे (मूळ रा.पूर्णा सिद्धार्थनगर, ता. पूर्णा जि. परभणी) याला पोलिसांनी तातडीने अटक केली असुन त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे करत आहेत.