आई, वडील आणि भावाच्या कष्टाचे झाले चीज ‘आकाश’ ची पोलिस शिपाईपदी निवड

मुख्य बातम्या शिरूर तालुका

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आकाशाने पोलिस होण्याचे केले स्वप्न केले साकार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्या आर्थिक परिस्थितीवर मात करत कारेगाव येथे राहणाऱ्या आकाश प्रकाश खिलारे (वय 25) मूळ रा. पारडी सावळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली या युवकाने कारेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहून पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यात त्याला आई-वडील आणि भाऊ यांनी मोलाची साथ दिल्याने त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. गेले पाच वर्षे आकाश हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अखेरीस त्याचे स्वप्न साकार झाले आहे.

आकाश हा आणि भाऊ यांच्या समवेत कारेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहतो. आकाशची आई कारेगाव येथे शेतात मोलमजुरीची काम करते. तर भाऊ आणि वडील रांजणगाव एमआयडीसीत खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. आकाश हा 2018 पासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परंतु 2018 झालेल्या पोलीस भरतीमध्ये एक मार्क कमी पडल्याने आकाशला अपयश आले. त्यानंतर 2019 मध्ये त्याने पुन्हा पोलीस भरतीची परीक्षा दिली. परंतु दोन वर्ष कोरोनामुळे भरतीची प्रक्रिया पुर्ण होऊ शकली नाही. यावर्षी 2023 ला पुन्हा पोलीस भरतीची प्रक्रिया चालु झाल्यानंतर आकाशने पुणे ग्रामीण पोलिस दलात भरतीसाठी अर्ज केला. त्यात एसी प्रवर्गातून त्याची पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे.

आई वडील आणि भावाचे स्वप्न साकार…

आकाशने पोलीस भरती व्हावे म्हणून आकाशची आई भारताबाई, वडील प्रकाश, भाऊ विकास यांनी रात्रंदिवस कष्ट केले. आईचे शिक्षण कमी असल्याने कारेगाव येथे शेतमजुरी करुन आईने आकाशला पोलिस भरतीसाठी पै पै गोळा करुन मदत केली. तर वडिलांनी रांजणगाव एमआयडीसी मध्ये सिक्युरिटीची नोकरी करुन आकाशला आर्थिक मदत केली. आणि भावाने रांजणगाव एमआयडीसी मध्ये खाजगी कंपनीत नोकरी करत मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा करत करुन स्वतःचे शिक्षण करत असताना भावाला आर्थिक व मानसिक आधार दिला.

बारावी नंतर ठरवलेलं ध्येय पुर्ण झालं…

यावेळी बोलताना आकाश खिलारे म्हणाला मी बारावी पास झाल्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न पाहिलं होत. परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे हे स्वप्न साकार होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला. माझे आई, वडिल आणि भावाने 2018 ते 2023 या पाच वर्षात रात्रंदिवस कष्ट करुन मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. मी सुरवातीला छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरती साठी सराव केला. नंतर शिरुर येथील ज्ञानसागर अभ्यासिकेत पोलिस भरतीसाठी अभ्यास तर सी टी बोरा कॉलेज इथल्या मैदानावर मी धावण्याचा सराव केला. माझ्या या यशात कारेगाव येथील आनंदा खंडू नवले आणि गणेश आनंदा नवले यांचाही वाटा असल्याचे त्याने सांगितले.

रांजणगाव MIDC चे पोलिस उपनिरीक्षक नीळकंठ तिडके यांच्या हस्ते आकाशचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आकाशची आई भारताबाई खिलारे, वडिल प्रकाश खिलारे, भाऊ विकास खिलारे घरमालक आनंदा नवले, पंडित नवले, गणेश नवले, सागर नवले आदी यावेळी उपस्थित होते.