न्हावरे (तेजस फडके) गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदच्या रस्ते नियोजन विकास निधीतुन (इतर जिल्हा मार्ग) ७० लाख रुपये मंजुर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोशन तुमसारे यांनी दिली.
या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ (पाटील) यांनी शिरुर येथील उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांना वारंवार पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला होता.
तसेच जिल्हा नियोजन समितीवर सध्या प्रशासक असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार माऊली कटके यांनीही या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जिल्हा परिषदने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदच्या रस्ते नियोजन विकास निधीतुन (इतर जिल्हा मार्ग) ७० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.
शिंदोडी-गुनाट हा न्हावरे तसेच निर्वी या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असुन लवकरच हे काम सुरु होणार आहे.