पुणे-नगर महामार्गावर शिवशाही एस टी बसच्या धडकेत एक जण ठार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव येथील यश इन चौक हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असुन रांजणगाव MIDC त जाण्यासाठी या चौकात कायमच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात होत असुन शनिवार (दि 15) रोजी रात्री 9 च्या दरम्यान येथे अज्ञात पिकउपने एका युवकास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर रविवार (दि 16) रोजी दुपारी 1:25 च्या दरम्यान कारेगाव येथुन मित्राच्या गाडीवर रांजणगाव येथे जाणाऱ्या तरुणाला शिवशाही एस टी बसची धडक बसल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. त्यामुळे अवघ्या 16 तासातच दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत श्रीकांत नागेश भारती (वय 24 ) रा. लांडेवस्ती, रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे हा रविवार (दि 16) रोजी दुपारी 1:25 च्या सुमारास त्याचा मित्र बालाजी आश्रोबा घायवळ याच्यासोबत कारेगाव वरुन रांजणगावकडे MH 22 AQ 0584 या दुचाकीवरुन चाललेला असताना यश इन चौकातील हॉटेल रेजन्सी समोर आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या MH 09 EM 2467 या शिवशाही एस टी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही युवक खाली पडले. त्यातील श्रीकांत भारती यांच्या अंगावरुन एस टी चे मागचे चाक गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत बालाजी आश्रोबा घायवळ (वय 26) रा. लांडेवस्ती, रांजणगाव, ता.शिरुर जि.पुणे मुळ (रा.मन्नतनगर, गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी) याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये एस टी चालक मारुती पोपट हरगुडे, रा. सणसवाडी ता. शिरुर, जि. पुणे याच्या विरोधात रीतसर फिर्याद दिली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

यश इन चौकात गतिरोधक बसविणे गरजेचे

कारेगाव येथील यश इन चौकात सकाळी आणि संध्याकाळी मोठया प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी दोन्हीकडे गतिरोधक बसवावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. या ठिकाणी पुण्याकडुन नगरकडे जाताना उतार असल्याने वाहनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे अपघात होतात. त्यामुळे याठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी अनेक वाहनचालकांनी केली आहे.