शिक्रापूरच्या उपसरपंचावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल पांडुरंग खरपुडे व वैभव पांडुरंग खरपुडे या दोघांवर एका महिलेकडून बिल्डींग मटेरियल खरेदी करुन तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल खरपुडे यांनी यापूर्वी छाया मोरे यांच्याकडून बांधकाम साठी लागणाऱ्या 6 लाख 46 हजार रुपयांच्या विटा घेतल्या होत्या. त्यानंतर 1 लाख 31 हजार रुपये छाया मोरे यांच्या रुद्र एंटरप्रायजेस नावाने चेक द्वारे दिले होते. त्यानंतर 5 लाख 15 हजार रुपये देण्यासाठी 6 महिन्यांची मुदत खरपुडे यांनी मागितली. त्यामुळे मोरे यांनी सहा महिन्यांची मुदत देखील दिली.

मात्र त्यांनतर देखील खरपुडे हे पैसे देण्यास टाळाटाळ करत राहिल्याने, छाया मोरे व त्यांचे पती गणेश मोरे दोघे विशाल खरपुडेच्या ऑफिस ला गेले असता विशाल खरपुडे याने तुमचे कसले पैसे राहिले हे पहा तुम्हाला चेकने सगळे पैसे दिलेले आहेत, असे म्हणून बँक स्टेटमेंट देखील दाखवले. त्यामुळे मोरे यांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील तपासाला असता कोणताही चेक मोरे यांच्या खात्यामध्ये जमा झाला नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे मोरे यांनी विशाल खरपुडे यांच्या बँक खात्याची माहिती काढली असता विशाल खरपुडे व त्यांचा भाऊ वैभव खरपुडे या दोघांनी संगनमत करुन मोरे यांचे फर्म असलेल्या रुद्र एंटरप्रायजेस नावाने एका बँकेत खाते काढून त्यामध्ये 5 लाख 15 हजार रुपये चेकद्वारे भरुन मोरे यांना पैसे दिल्याचे भासवून त्यांची 5 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

याबाबत छाया गणेश मोरे (वय २८) रा. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल पांडुरंग खरपुडे व वैभव पांडुरंग खरपुडे दोघे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.