शिक्रापुर (ओंकार भोरडे): शिक्रापुर परिसरातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा व मोकळ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी व्यापारी असोसिएशन व विविध दुकानांचे व्यापारी प्रतिनिधी यांची समन्वय बैठक घेण्यात आली.
या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसह बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था, दुकानांसमोरील अडथळे, फुटपाथवरील जाहिरात फलक, रस्त्यांमधील अनधिकृत पार्किंग, भाजीविक्रेते, पानटपऱ्या, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, अनधिकृत लाईट खांब, विनापरवाना लावलेले फ्लेक्स बोर्ड, कंपन्यांच्या बस थांब्यांमुळे होणारी अडचण, तसेच गतिरोधकांबाबत व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व अडचणींवर कायदेशीर व समन्वयातून उपाययोजना करण्याचे आश्वासन शिक्रापूर पोलिसांकडून देण्यात आले.
तसेच व्यापाऱ्यांवर कोणतीही व्यक्ती बेकायदेशीर दबाव टाकत असेल, पैसे किंवा खंडणीची मागणी करत असेल, दमदाटी अथवा धमक्या देत असेल, रोड रोमिओ किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देत असतील, तर अशा प्रकारांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कडुन करण्यात आले. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
या बैठकीत परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, बाजारपेठ व व्यापारी भागात नियमित पोलीस पेट्रोलिंग वाढविणे, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नियोजन करणे, तसेच व्यापाऱ्यांच्या अडचणींवर विशेष लक्ष देणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. उद्योग-व्यवसाय सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरु राहावेत यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडून २४ तास आवश्यक ते सहकार्य व संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणतीही संशयास्पद घटना, बेकायदेशीर प्रकार, धमकी, खंडणीची मागणी किंवा व्यापाऱ्यांना त्रास देणारी घटना निदर्शनास आल्यास विलंब न करता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. त्यांनी आपला मोबाईल क्रमांक व्यापाऱ्यांना देत समस्या फोन किंवा मेसेजद्वारे कळवाव्यात आणि त्यावर वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल, असेही सांगितले.
या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील अडचणी मांडल्या. पोलिसांच्या या सकारात्मक भूमिकेचे उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी स्वागत करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित व्हाव्यात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे, भाजपा नेते पंढाभाऊ गायकवाड, निलेश राऊत, शरद टेमगिरे, प्रकाश चव्हाण, अतुल पानमंत, अंकुश घारे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व अनेक व्यापारी उपस्थित होते.