रुग्णवाहिका चालकांच्या वेगांवर नियंत्रणाची गरज…

क्राईम शिरूर तालुका

रुग्णवाहिकांमुळे जीव वाचण्या ऐवजी जीव गमावण्याची वेळ

शिक्रापूर (शेरखान शेख): अपघात ग्रस्थांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची मानली जात असून रुग्णवाहिकेमुळे अनेकांना जीवदान मिळू शकते तर काहींना रुग्णवाहिकेमुळे जीव देखील गमवावा लागतो अशी स्थिती निर्माण झालेली असून रुग्णवाहिका चालकांच्या वेगांवर नियंत्रणाची गरज निर्माण झाली आहे.

अपघात समयी कोठही नागरिक प्रथम रुग्णवाहिकेशी संपर्क करुन रुग्णवाहिका बोलावून घेत अपघात ग्रस्ताला रुग्णालयात दाखल करत असतात त्यामुळे रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेत आहे, अनेकदा काही ठिकाणी अपघात झाल्यास एकाच वेळी तीन चार रुग्णवाहिका सदर ठिकाणी दाखल होतात.

परंतु रस्त्याने अपघाताच्या दिशेने एक दोन रुग्णवाहिका चाललेल्या असल्याचे दिसून येत असताना सुद्धा काही रुग्णवाहिका चालक मोठ्या वेगाने समोरच्या रुग्णवाहिकेला ओहरटेक करुन समोर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांमध्ये चढाओढ चालल्याचे दिसून येते. अनेकदा काही ठिकाणी रुग्णवाहिका चालक मोठ्याने सायरनचा आवाज करत नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचे कृत्य करत असतात.

पुणे नगर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एका अपघात ग्रस्ताच्या मदतीसाठी चाललेल्या रुग्णवाहिका चालकाचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एम तेच १६ क्यू ८०५४ या रुग्णवाहिकेची धडक बसून झालेल्या अपघातात एका युवकाला जीव गमवावा लागला आहे तर रुग्णवाहिका चालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी होऊन रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला आहे.

मात्र रुग्णवाहिका चालकाने नियमांचे पालन तसेच नियंत्रण ठेवून वाहन चालवले असते तर एका युवकाला नाहक प्राणाला मुकावे लागले नसते तसेच रुग्णवाहिकेचे नुकसान होऊन चालकासह त्याचा साथीदार जखमी झाला नसता त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी वेगांवर नियंत्रण ठेवून नियमांचे पालन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

रुग्णवाहिका चालकांनी खबरदारी घ्यावी; डॉ. रवींद्र टेमगिरे (संचालक सूर्या हॉस्पिटल)

रुग्णवाहिका चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन, गर्दीवर नियंत्रण ठेवून विशेष खबरदारी घेत रुग्णवाहिका चालवणे गरजेचे आहे त्यामुळे नागरिकांना त्रास आणि काही अपघात होणार नाही असे सूर्या हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी सांगितले.

रुग्णवाहिका चालकांनी नियमांचे पालन करावे; अमोल खटावकर (पोलीस उपनिरीक्षक)

रुग्णवाहिकांना अत्यावश्यक असल्यास काही नियमांमध्ये थोडीफार सूट आहे. मात्र रुग्णवाहिका चालकांनी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. महामार्गावर सर्व्हीस रोड नसल्याने मोठी गर्दी असते त्यामुळे कोठे अपघात झाल्यास त्यांनी काळजी घेऊन रुग्णवाहिका चालवणे गरजेचे असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांनी सांगितले.