न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील निमोणे गावात नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन वाद निर्माण होऊन एका महिलेला अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता फिर्यादीच्या कुटुंबीयांवरही दगडफेक करुन दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमोणे परिसरात खळबळ उडाली असून, गावातील रस्त्यांच्या वापरावरुन होणारे वाद आता थेट महिलांच्या सुरक्षिततेपर्यंत पोहोचत असल्याचे गंभीर चित्र दिसत आहे.
मंगळवार दि ७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ च्या सुमारास निमोणे गावच्या हद्दीत नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या विटभट्टीच्या खालच्या बाजूने असलेल्या रस्त्याने नदीकडे जात असताना आरोपी माणिक प्रल्हाद जाधव हा रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याच्याजवळ जाऊन, “आमचे ट्रॅक्टर मोटारी काढण्यासाठी खाली गेले आहेत, ते ट्रॅक्टर वर येऊ द्या,” असे सांगितले. मात्र यावरुन आरोपी माणिक जाधव संतापला आणि फिर्यादीच्या अंगावर धावून जात अश्लील भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आहे आहे.
या प्रकरणात माणिक प्रल्हाद जाधव आणि शेखर माणिक जाधव, दोघेही (रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विनोद मोरे करीत आहेत.