शिरूर (अरुणकुमार मोटे): इस्रो–नासा विद्यार्थी निवड प्रक्रियेत तालुकानिहाय वेगवेगळे मेरिट निकष लागू करून शिरूरसह अनेक तालुक्यांतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व व्हिसलब्लोअर निलेश यशवंत वाळुंज यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्यासह राज्य व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, सात दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास १० ऑगस्टपासून पंचायत समिती शिरूर कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, शिरूर तालुक्यातील ३,०८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२९ विद्यार्थी पहिल्या, तर ३५ विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले. मात्र अंतिम निवडीसाठी शिरूरचा मेरिट कटऑफ १८ ठेवण्यात आला असून, तो पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तालुका शिक्षण कार्यालयाच्या माहितीनुसार, आंबेगाव व मुळशी येथे १६, खेड येथे १७, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, मावळ व पुरंदर येथे १५, तर वेल्हे येथे १४ असा मेरिट निकष निश्चित करण्यात आला आहे. समान प्रश्नपत्रिका, समान परीक्षा आणि समान मूल्यमापन असूनही तालुकानिहाय वेगवेगळे निकष ठेवणे हे समान संधी व गुणवत्तेच्या तत्त्वांना विरोधी असल्याचा आरोप वाळुंज यांनी केला आहे.
या निर्णयामुळे शिरूरसह ग्रामीण भागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याची भावना विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे. निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवून सर्व तालुक्यांसाठी समान मेरिट निकष लागू करावेत, संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय, तालुक्यातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला असून, शासनाने दोन्ही विषयांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा १० ऑगस्ट २०२६ पासून पंचायत समिती शिरूर कार्यालयासमोर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सहभागातून सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निलेश वाळुंज यांनी दिला आहे.