शिरुरकरांनो सावधान तुमचं पिण्याचे पाणी दुषित होतय…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर नगरपरिषदेचे मलनिस्सारणाचे पाणी सोडले जातेय थेट घोडनदी पात्रात 

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी शहर स्वच्छता हे ध्येय ठेवून भुयारी गटार योजना राबविण्यात आलेली आहे. सदर योजना स्वयंपूर्ण राहण्याकरिता जलनिसःरण ‘कर’ सुध्दा शहरात लागू करण्यात आला आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासुन शिरुर शहराचा सेवेज ट्रिटमेंट प्लॅट (STP) बंद अवस्थेत असून नगरपरिषद मलनिसरण प्रक्रिया न करता शिरुर नगरपरिषद मलनिस्सारणाचे पाणी थेट “घोडनदी” पात्रामध्ये सोडत आहे.

शिरुर शहरामध्ये भुयारी गटारी योजना राबविण्यात आलेली असतानाही पाण्यावर मलनिसरण प्रक्रिया न करता दुषित पाणी नदीपात्रात सोडुन शिरुर ‌नगरपरिषद पर्यावरणा बरोबरच नदीच्या पाण्याला पुर्णता दुषित करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे गांभीर्याने या घटनेचा विचार करुन तात्काळ शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यावर नदीपात्र दूषित केल्याच्या कारणास्तव फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा याविरुद्ध लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारचे निवेदन मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद व मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना दिले आहे.

 

शिरुर नगरपरिषदेच्या मलनिःसारणाचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता “घोडनदी” पात्रांमध्ये सोडत असल्याचे पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कठोर कारवाई न केल्यास लवकरच हरीत लवाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

महिबुब सय्यद 

मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष