शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढयाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट पसरली आहे.
त्यात भर म्हणून (दि १२) जून रोजी शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके हे शिरुर शहरात आले होते. त्यांनी शिरुर बसस्थानक येथे लोकार्पण सोहळा पार पाडला आणि नगर परिषद कार्यालयात आढावा बैठकही घेतली. मात्र शिरुर शहरात उपस्थित असुनही त्यांनी उपोषणस्थळी येण्याचे टाळले. निलेश वाळुंज यांच्यासह आंदोलनकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या अपेक्षेने आमदार कटके यांची वाट पाहत होते. मात्र त्यांच्या या वर्तनाने आंदोलनकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
“आमदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनकर्त्यांच्या व्यथा समजून घेतल्या असत्या, तर संघर्षाची तीव्रता कमी झाली असती. पण त्यांनी मुद्दाम पाठ फिरवली,” असा आरोप आंदोलकांनी केला आहे. सत्याग्रहकर्त्यांच्या मते, हे केवळ दुर्लक्ष नसून जनतेच्या भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. या आंदोलनाला आता सामाजिक संघटनांबरोबरच युवक आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून लोकांच्या दुःखावर मलम लावणे गरजेचे आहे असे तीव्र मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. आता प्रश्न उभा राहतो तो आंदोलनकर्त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार का…? की ते फक्त लोकार्पण सोहळ्यापुरतेच शिरुरमध्ये दाखल होणार…? सत्याग्रहाला पाठिंबा वाढत चालल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक ठरत आहे.
निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत
आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नातून एस.टी. बससेवेचे लोकार्पण, आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता
शिरुर; लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार ; पीडित तरुणीची रांजणगाव पोलिसांकडे तक्रार