रांजणगाव MIDC पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी रात्रभर जागून वाहनचालकांना दाखवली योग्य वाट

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सध्या सगळीकडे पाऊसाने धुमाकूळ घातला असुन शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई, कारेगाव तसेच इतरही अनेक गावात या अवकाळी पाऊसाने प्रचंड मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमवार (दि 17) रोजी पिंपरी दुमाला, खंडाळे परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे रांजणगाव गणपती- गणेगाव रस्त्यावर असणाऱ्या एका पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने रात्री 11 च्या सुमारास एका स्विफ्ट मधील तीन जण पुराच्या पाण्यात वाहून चालले होते. परंतु दोन युवकांच्या प्रसंगावधनामुळे त्यांचा जीव वाचला.

सोमवार (दि 17) रोजी वाघाळे, गणेगाव,पिंपरी दुमाला आणि खंडाळे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने रांजणगाव गणपती- गणेगाव रस्त्यावर असणारा पुल पाण्याखाली गेला. रात्री 11 च्या सुमारास रांजणगाव कडुन स्विफ्ट कार मधुन गणेगाव कडे तिघेजण चालले असताना पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने स्विफ्टसह तिघेजण पाण्यात वाहून जाऊ लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. परंतु गाडीचे दरवाजे पाण्यात लॉक झाल्याने उघडले नाहीत. सुदैवाने गाडीच्या पाठीमागच्या दरवाज्याची काच उघडी असल्याने त्यावेळेस त्यांचा आरडाओरडा ऐकून प्रमोद खेडकर आणि सागर नळकांडे या दोन युवकांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना पाठीमागच्या दरवाज्यात बाहेर काढण्यासाठी मदत केली.

त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांना ह्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने रांजणगाव MIDC तील अग्निशमन दलाला फोन करुन घटनास्थळी येण्यास सांगितले. परंतु पाण्यात वाहून जाणारे युवक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी परत गेले. परंतु पोलिसांनी मात्र पुराचा धोका ओळखून त्याच ठिकाणी रात्र जागून काढली.

पिंपरी दुमालाचे पोलिस पाटील संतोष जाधव यांनी रांजणगाव-गणेगाव रस्त्यावर आसपासच्या युवकांच्या मदतीने रात्रभर येणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या मार्गे जाण्याचा सल्ला दिला. तर पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलिस नाईक पांडुरंग साबळे, हेमंत इनामे यांनी पुलाच्या दुसऱ्या बाजूला गणेगाव-रांजणगाव रस्त्यावर रांजणगावकडे जाणाऱ्या वाहन चालकांना दुसऱ्या मार्गाने पाठवून दिले.

पोलिसांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे अनेक वाहनचालक पुराच्या पाण्यात जाण्यापासुन वाचले अन्यथा एखादी अनुचित घटना घडली असती असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रात्रभर एकीकडे पिंपरी दुमालाचे पोलिस पाटील संतोष जाधव आणि दुसरीकडे पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पहारा देत 8 ते 10 गाड्या पाण्यात जाण्यापासुन वाचवल्या. त्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.